मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › डिसेंबर 2027 › 12 डिसेंबर
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 12 डिसेंबर 2027
रविवार · आगमनकाळाचा तिसरा आठवडा
सण आणि संत
आगमनकाळाचा तिसरा रविवार
रविवार · उपासनेचा रंग: गुलाबी
दिवसाची वाचने
पहिले वाचन
14सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर! 15कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही! 16त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको. 17परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
प्रतिसाद स्तोत्र
2पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.” 3तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल. 4त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा. 5परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो. 6अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”
दुसरे वाचन
4प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा. 5सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. 6कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; 7म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
शुभवर्तमान
10नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?” 11त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.” 12काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?” 13तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका. 14काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.” 15तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत. 16त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. 17त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” 18योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली.
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र C, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष II.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क