मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2027 › 7 नोव्हेंबर
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 7 नोव्हेंबर 2027
रविवार · सामान्यकाळाचा 32वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाचा 32वा रविवार
रविवार · उपासनेचा रंग: हिरवा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
10तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” 11ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!” 12तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.” 13तेव्हा एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे, त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. 14इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.” 15तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा पुत्र यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. 16पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
प्रतिसाद स्तोत्र
7तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो. 8परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो. 9परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो. 10परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.
दुसरे वाचन
24कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला. 25जसा महायाजक दरवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो तसे त्यास पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्पण करायचे नव्हते. 26तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे. 27ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, 28तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.
शुभवर्तमान
38शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. 39आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. 40ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.” 41येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. 42नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली. 43येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. 44मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क