Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 27 सप्टेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 14 सप्टेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 27 सप्टेंबर 2027

सोमवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 15वा आठवडा · स्वर 5

सण आणि संत

The Universal Exaltation of the Precious and Life-Giving Cross

एकदिवसीय उपवास · कडक उपवास

उपवास: तेलासह

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

निर्ग 15:22–16:1

22मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही. 23तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांस ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव मारा पडले. 24लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?” 25मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली. 26तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. 27मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला. 16:1मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाली व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले.

संध्याप्रार्थना: वाचन

नीति 3:11–18

11माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस, 12जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो. 13ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते. 14ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. 15ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही. 16तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत. 17तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत. 18जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.

संध्याप्रार्थना: वाचन

यश 60:11–16

11तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे. 12खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील. 13माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील. 14ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील. 15“तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.” 16तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

योहा 12:28–36

28हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.” 29तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.” 30येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. 31आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल. 32आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.” 33तो तर आपण कोणत्या मरणाने मरणार पाहिजे हे सुचविण्याकरिता हे बोलला. 34लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर “मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे” असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? 35यावरुन येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला; यासाठी कि अंधकाराने तुम्हास गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही. 36तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.

प्रेषितांचे पत्र (क्रूसाच्या उन्नयनासाठी)

1 करिं 1:18–24

18कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. 19कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि बुद्धिवंताची बुद्धि मी व्यर्थ करीन.” 20ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले नाही का? 21म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले. 22कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, 23परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. 24परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे.

शुभवर्तमान (क्रूसाच्या उन्नयनासाठी)

योहा 19:6–11, 13–20, 25–28, 30–35

6मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला “वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.” 7यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे; कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले.” 8पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला; 9आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. 10पिलाताने त्यास म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला माहीत नाही काय?” 11येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.” 13म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. 14तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!” 15यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.” 16मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले. 17तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. 18तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले. 19आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते. 20येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता. 25पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या. 26येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.” 27मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले. 28मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, “मला तहान लागली आहे” असे म्हटले. 30येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. 31तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे. 32तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय तोडले. 33परंतु ते येशूजवळ आल्यावर, तो मरून गेला आहे असे पाहून, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. 34तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले. 35आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 14 सप्टेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 27 सप्टेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क