Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 12 सप्टेंबर

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 12 सप्टेंबर 2027

रविवार · सामान्यकाळाचा 24वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाचा 24वा रविवार

रविवार · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

यश 50:5–9

5प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे, आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही. 6ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. 7कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही. 8मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या. 9पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 116:1–6, 8–9

1मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. 2कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन. 3मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. 4नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.” 5परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. 6परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले. 8तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. 9जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.

दुसरे वाचन

याको 2:14–18

14माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय? 15जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, 16आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्‍या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? 17म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे. 18आता, कोणी मनुष्य म्हणेल की, “तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत.” तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन.

शुभवर्तमान

मार्क 8:27–35

27मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पा कैसरीया नामक प्रदेशास जाण्यास निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?” 28त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.” 29मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.” 30येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.” 31तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे. 32त्याने हे स्पष्टपणे सांगितले, तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्यास दटावू लागला. 33परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.” 34नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. 35जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क