मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › सप्टेंबर 2027 › 9 सप्टेंबर
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 9 सप्टेंबर 2027
गुरुवार · सामान्यकाळाचा 23वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 23व्या आठवड्याचा गुरुवार
ऐच्छिक स्मृतिदिन · उपासनेचा रंग: हिरवा
संत पीटर क्लेव्हर, धर्मगुरू · ऐच्छिक स्मृतिदिन
दिवसाची वाचने
पहिले वाचन
12तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा. 13एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. 14पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. 15ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा. 16ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा. 17आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
प्रतिसाद स्तोत्र
1परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. 2त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. 3शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. 4डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. 5जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. 6प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
शुभवर्तमान
27“परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा. 28जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 29जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका. 30जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. 31आणि जसे मनुष्यांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. 32तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. 33तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात. 34ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात. 35परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. 36जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.” 37“दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. 38द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.”
आजचे संत
- संत पीटर क्लेव्हर, धर्मगुरू
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क