मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › एप्रिल 2027 › 8 एप्रिल
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 8 एप्रिल 2027
गुरुवार · पास्काकाळाचा दुसरा आठवडा
सण आणि संत
पास्काकाळाच्या दुसऱ्या आठवड्याचा गुरुवार
आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: पांढरा
दिवसाची वाचने
पहिले वाचन
27त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा महायाजकाने त्यांना विचारले, 28“या नावाने शिक्षण देऊ नका, असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले होते की नाही, तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम शहर भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.” 29परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे, 30ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले, त्यास आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. 31त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्यास आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. 32या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला, आहे तो सुध्दा साक्षी आहे.” 33हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.
प्रतिसाद स्तोत्र
1दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत. मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल. 8परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो. 16परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो. 17नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल. 18जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो. 19नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
शुभवर्तमान
31जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. 32जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही. 33ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ यावर आपला शिक्का लावला आहे. 34कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. 35पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे. 36जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क