Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 20 मार्च

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 7 मार्च (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 20 मार्च 2027

शनिवार · महान लेंतचा पहिला आठवडा · स्वर 8

सण आणि संत

Hieromartyrs Basil, Ephraim, Eugene, Elpidius, Agathodorus, Aetherius, and Kapiton of Cherson (4th C)

महान लेंत

उपवास: तेलासह

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

इब्री 1:1–12

1देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला, 2परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. 3पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला. 4तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे. 5देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’ 6आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.” 7देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.” 8पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे. 9नीतिमत्त्व तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंददायी तेलाचा अभिषेक केला आहे.” 10आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे. 11ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील. 12तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.

प्रेषितांचे पत्र (संत थिओडोर यांच्यासाठी)

2 तीम 2:1–10

1माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो. 2माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे. 3ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. 4सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. 5जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही. 6कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. 7जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल. 8माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर. 9कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही. 10ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे.

शुभवर्तमान

मार्क 2:23–3:5

23नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले. 24तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?” 25येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय? 26अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?” 27तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही. 28म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.” 3:1मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. 2येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. 3येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.” 4नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले. 5मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.

शुभवर्तमान (संत थिओडोर यांच्यासाठी)

योहा 15:17–16:2

17तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करतो. 18जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे. 19जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हास जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते, 20‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याही पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. 21पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील; कारण ज्याने मला पाठवले त्यास ते ओळखीत नाहीत. 22मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. 23जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24जी कामे दुसर्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे. 25तथापि ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते. 26पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. 27आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहात म्हणून तुम्हीही साक्ष द्याल.” 16:1“तुम्ही अडखळवले जाऊ नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. 2ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 7 मार्च म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 20 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क