Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 31 जानेवारी

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 18 जानेवारी (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 31 जानेवारी 2027

रविवार · स्वर 2

सण आणि संत

पेन्टेकॉस्टनंतरचा 35वा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रातःप्रार्थनेचे दुसरे शुभवर्तमान

मार्क 16:1–8

1शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मग्दालीया नगराची मरीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. 2आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. 3त्या एकमेकीस म्हणत होत्या की, कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील? 4नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. 5त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता. 6तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा. 7जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालील प्रांतात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल. 8मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या.

प्रेषितांचे पत्र

कल 3:12–16

12तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा. 13एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. 14पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. 15ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा. 16ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.

प्रेषितांचे पत्र (संत अथनेशियस आणि संत सिरिल यांच्यासाठी)

इब्री 13:7–16

7ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. 9विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले. 10ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. 11यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात. 12म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले, 13म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. 14कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 15म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” 16आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.

शुभवर्तमान

लूक 18:18–27

18एका यहूदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू?” 19येशू त्यास म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. 20तुला आज्ञा माहीत आहेत ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आई-वडीलांचा मान राख.” 21तो अधिकारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत.” 22जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्यास म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे. तुझ्याजवळचे सर्वकाही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये. माझ्यामागे चल.” 23पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. 24तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! 25होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” 26नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?” 27तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”

शुभवर्तमान (संत अथनेशियस आणि संत सिरिल यांच्यासाठी)

मत्त 5:14–19

14तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही. 15आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. 16तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. 17नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे. 18कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. 19यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 18 जानेवारी म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 31 जानेवारी. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क