मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 21 जानेवारी
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 21 जानेवारी 2027
गुरुवार · सामान्यकाळाचा दुसरा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या दुसऱ्या आठवड्याचा गुरुवार
स्मृतिदिन · उपासनेचा रंग: लाल
संत ॲग्नेस, कुमारिका आणि हुतात्मा · स्मृतिदिन
दिवसाची वाचने
पहिले वाचन
25म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे. 26म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे. 27जे मुख्य याजक पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्यास करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. 28कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला. 8:1आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे, 2तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे. 3प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते. 4जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजकदेखील झाला नसता कारण येथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत. 5ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचनेनुसार प्रत्येक गोष्ट कर.” 6परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे.
प्रतिसाद स्तोत्र
6यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस. 7म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे. 8माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे. 9मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे. 16परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत. ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.
शुभवर्तमान
7मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला. 8यरूशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. 9मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. 10कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते. 11जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” 12पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.
आजचे संत
- संत ॲग्नेस, कुमारिका आणि हुतात्मा
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क