Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 14 जानेवारी

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 14 जानेवारी 2027

गुरुवार · सामान्यकाळाचा पहिला आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या पहिल्या आठवड्याचा गुरुवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

इब्री 3:7–14

7म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, 8तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली, 9जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.” 10त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, “या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत.” 11म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.” 12बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. 13जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. 14कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 95:6–11

6याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू; 7कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. 8मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका, 9तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली. 10चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. 11म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.

शुभवर्तमान

मार्क 1:40–45

40एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” 41येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” 42आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. 43येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले. 44आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” 45परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क