Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 5 जानेवारी

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 23 डिसेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 5 जानेवारी 2027

मंगळवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 32वा आठवडा · स्वर 6

सण आणि संत

Forefeast of the Nativity

नाताळचा उपवास

उपवास: तेलाशिवाय शिजवलेले अन्न

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

याको 3:1–10

1माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. 2कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे. 3पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो. 4तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात. 5त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. 6आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. 7कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत. 8पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे. 9आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो. 10एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत.

शुभवर्तमान

मार्क 10:2–12

2काही परूशी येशूकडे आले. त्यांनी त्यास विचारले, “पतीने पत्नी सोडावी हे कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले. 3येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हास काय आज्ञा दिली आहे?” 4ते म्हणाले, “मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे.” 5येशू म्हणाला, “केवळ तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. 6परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना नर व नारी असे निर्माण केले. 7या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. 8आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. 9यासाठी देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने तोडू करू नये.” 10नंतर येशू व शिष्य घरात असता, शिष्यांनी या गोष्टीविषयी पुन्हा त्यास विचारले. 11तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. 12आणि जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते, तर तीही व्यभिचार करते.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 23 डिसेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 5 जानेवारी. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क