Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2026 › 16 नोव्हेंबर

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 16 नोव्हेंबर 2026

सोमवार · सामान्यकाळाचा 33वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 33व्या आठवड्याचा सोमवार

ऐच्छिक स्मृतिदिन · उपासनेचा रंग: हिरवा

संत गर्ट्रूड महान, कुमारिका · ऐच्छिक स्मृतिदिन

स्कॉटलंडच्या संत मार्गारेट · ऐच्छिक स्मृतिदिन

दिवसाची वाचने

पहिले वाचन

प्रक 1:1–4; 2:1–5

1हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळविण्यास सांगितले. 2योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वांविषयी साक्ष दिली; 3या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे. 4योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो. 2:1“इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत 2तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले. 3मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस. 4तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. 5म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 1:1–4, 6

1आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. 2परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. 3तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. 4परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. 6कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.

शुभवर्तमान

लूक 18:35–43

35येशू यरीहोजवळ येत असतांना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. 36जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले, ही कशाची गडबड चालली आहे. 37लोकांनी त्यास सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.” 38तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” 39जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!” 40येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, 41“मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी.” 42येशू त्यास म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे.” 43ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.

आजचे संत

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र A, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष II.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क