मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2026 › 19 ऑक्टोबर
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 6 ऑक्टोबर (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 19 ऑक्टोबर 2026
सोमवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 21वा आठवडा · स्वर 3
सण आणि संत
Holy and Glorious Apostle Thomas (1st C)
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रेषितांचे पत्र
10मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती. 11मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. 12दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. 13आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे. 14पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. 15फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. 16मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली. 17मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. 18पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. 19माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील. 20आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. 21ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. 22सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. 23प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
प्रेषितांचे पत्र (प्रेषित थोमा यांच्यासाठी)
9कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत. 10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो. 13जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. 14मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे. 15कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. 16यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
शुभवर्तमान
24पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे. 25जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल. 26जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.” 27“परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा. 28जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 29जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका. 30जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको.
शुभवर्तमान (प्रेषित थोमा यांच्यासाठी)
19त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 20आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले 21तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.” 22एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. 23ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” 24येशू आला तेव्हा, बारांतील एक, ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. 25म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी त्याच्या हातात खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही.” 26आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 27मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.” 28आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!” 29येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!” 30आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. 31पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 6 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 19 ऑक्टोबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क