Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2027 › 2 नोव्हेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 20 ऑक्टोबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 2 नोव्हेंबर 2027

मंगळवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 20वा आठवडा · स्वर 2

सण आणि संत

Great Martyr Artemius of Antioch († 362)

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

फिलि 2:16–23

16जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. 17तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; 18आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. 19प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल. 20कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा, दुसरा कोणी समान वृतीचा माझ्याजवळ नाही; 21कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. 22पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो, तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली. 23म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो.

प्रेषितांचे पत्र (संत आर्तेमियस यांच्यासाठी)

2 तीम 2:1–10

1माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो. 2माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे. 3ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. 4सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. 5जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही. 6कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. 7जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल. 8माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर. 9कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही. 10ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे.

शुभवर्तमान

लूक 9:23–27

23आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. 24कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. 25कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल? 26जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. 27आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 20 ऑक्टोबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 2 नोव्हेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क