Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2027 › 7 ऑक्टोबर

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 7 ऑक्टोबर 2027

गुरुवार · सामान्यकाळाचा 27वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 27व्या आठवड्याचा गुरुवार

स्मृतिदिन · उपासनेचा रंग: पांढरा

जपमाळेची माता मरीया · स्मृतिदिन

दिवसाची वाचने

पहिले वाचन

मला 3:13–4:2

13परमेश्वर म्हणतो, “तुमचे शब्द माझ्याविरूद्ध कठोर झाले आहेत. पण तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरूद्ध काय बोललो?” 14तुम्ही म्हणालात “परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे; आम्ही त्याचे आज्ञापालन केले, आणि आम्ही सेनाधीश परमेश्वरापुढे शोक करत चाललो याचा काय लाभ झाला? 15तर आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो, होय, जे दुष्टाई करतात ते वाढवले जातात, आणि ते देवाची परीक्षा पाहतात तरी सुटतात.” 16तेव्हा जे परमेश्वराचे भय धरीत असत ते एकमेकांशी बोलत होते, आणि परमेश्वराने ते ध्यान देऊन ऐकले. मग जे परमेश्वराचे भय धरत असत आणि त्याच्या नांवाचा सन्मान करत असत त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले. 17सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “मी हे करीन त्या दिवशी ते माझे, म्हणजे माझे खासगीचे धन होतील, आणि जसा कोणी आपली सेवा करणारा आपला मुलगा याच्यावर दया करीत असतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. 18तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हास कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील फरक तुम्हास समजेल.” 4:1“कारण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी किंवा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. 2“परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 1:1–4, 6

1आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. 2परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. 3तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. 4परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात. 6कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.

शुभवर्तमान

लूक 11:5–13

5मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्यास म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, 6कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्यास वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ 7आणि तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दरवाजा लावलेला आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’ 8मी तुम्हास सांगतो की, जरी तो उठून त्यास काही देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तरी त्याच्या मित्राच्या आग्रहामुळे तो खात्रीने उठून त्यास जितक्या भाकरींची गरज आहे तितक्या त्यास देईल. 9आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. 10कारण जो कोणी मागतो त्यास मिळेल. जो कोणी शोधतो त्यास सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. 11तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? 12किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल? 13जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हास तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क