Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 7 ऑगस्ट

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 25 जुलै (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 7 ऑगस्ट 2027

शनिवार · पेन्टेकॉस्टनंतरचा सातवा आठवडा · स्वर 5

सण आणि संत

Dormition of the Righteous Anna, Mother of the Most Holy Theotokos

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रेषितांचे पत्र

रोम 12:1–3

1म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. 2आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी. 3कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.

प्रेषितांचे पत्र (संत आन्ना यांच्यासाठी)

गल 4:22–31

22कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. 23पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. 24या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय. 25कारण ही हागार अरबस्तानातील सीनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या यरूशलेमेच्या जोडीची आहे. आपल्या मुलांबाळांसह दास्यात आहे. 26नवीन वरील यरूशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे. 27पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत.” 28आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. 29परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. 30पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’ 31तर मग, बंधूंनो, आपण दासीची मुले नाही, पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

शुभवर्तमान

मत्त 10:37–11:1

37जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. 38जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. 39जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील. 40जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते. 41जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. 42मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही. 11:1येशूने त्याच्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावामध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला.

शुभवर्तमान (संत आन्ना यांच्यासाठी)

लूक 8:16–21

16आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने झाकत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. 17कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. 18म्हणून तुम्ही कसे ऐकता यांविषयी जपा, कारण ज्याच्याजवळ आहे त्यास दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे म्हणून त्यास वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.” 19तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आली आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. 20तेव्हा कोणी त्यास सांगितले, तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटायला पाहत असून बाहेर उभे राहिले आहेत. 21आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 25 जुलै म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 7 ऑगस्ट. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क