मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जुलै 2027 › 9 जुलै
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 9 जुलै 2027
शुक्रवार · सामान्यकाळाचा 14वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 14व्या आठवड्याचा शुक्रवार
ऐच्छिक स्मृतिदिन · उपासनेचा रंग: हिरवा
संत ऑगस्टीन झाओ रोंग आणि सोबती, हुतात्मे · ऐच्छिक स्मृतिदिन
उपवास आणि प्रायश्चित्त
प्रायश्चित्ताचा दिवस
प्रत्येक शुक्रवार प्रायश्चित्ताचा दिवस आहे; तो कसा पाळायचा ते प्रत्येक बिशप परिषद ठरवते: मांसत्याग किंवा प्रायश्चित्ताचे दुसरे एखादे कृत्य. उपवास 18 ते 59 वयासाठी बंधनकारक आहे, मांसत्याग 14 वर्षांपासून.
दिवसाची वाचने
पहिले वाचन
1इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली. 2रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?” 3तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन. 4मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.” 5मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले. 6त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली. 7त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले. 28याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. 29योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला. 30मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मला शांतीने मरण येवो, मी तुझे तोंड पाहिले आहे, आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
प्रतिसाद स्तोत्र
स्तोत्र 37:3–4, 18–19, 27–28, 39–40
3परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर. 4परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल. 18परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील. 19वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल. 27वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील. 28कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील. 39नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन. 40परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.
शुभवर्तमान
16लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. 17मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील. 18माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल. 19जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल. 20कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. 21भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. 22माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. 23एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
आजचे संत
- संत ऑगस्टीन झाओ रोंग आणि सोबती, हुतात्मे
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क