मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 4 मार्च
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 19 फेब्रुवारी (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 4 मार्च 2027
गुरुवार · मांसत्यागाचा आठवडा · स्वर 6
सण आणि संत
मांसत्यागाच्या आठवड्याचा गुरुवार
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रेषितांचे पत्र
20“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. 21जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे. 5:1येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. 2देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो. 3देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. 4कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. 5येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे? 6जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला. 7आत्मा हा साक्ष देणारा आहे कारण आत्मा सत्य आहे. 8साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत. आत्मा, पाणी आणि रक्त, या तिघांची एकच साक्ष आहे. 9जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या पुत्राविषयीची आहे. 10जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. 11आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. 12ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही. 13जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे. 14आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. 15आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. 16जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही. 17सर्व अनीती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही. 18आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत राहत नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही. 19आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग हे त्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे. 20पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे. 21माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.
शुभवर्तमान
1पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले. 2पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.” 3मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले. 4मग पिलाताने त्यास पुन्हा प्रश्न विचारला, तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते कितीतरी गोष्टींविषयी तुझ्यावर आरोप करत आहेत! 5पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले. 6वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे. 7बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. त्याने दंगलीमध्ये खून केल्याबद्दल त्यास पकडण्यात आले होते. 8लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. 9पिलाताने विचारले, तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? 10पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. 11परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांस चिथवले. 12परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? 13ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! 14पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! 15पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 19 फेब्रुवारी म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 4 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क