मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › मार्च 2027 › 2 मार्च
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 17 फेब्रुवारी (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 2 मार्च 2027
मंगळवार · मांसत्यागाचा आठवडा · स्वर 6
सण आणि संत
मांसत्यागाच्या आठवड्याचा मंगळवार
उपवास
उपवास नाही
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रेषितांचे पत्र
10ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्त्वाने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही. 11आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे. 12काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्याच्या भावाची कृत्ये न्यायी होती. 13बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. 14आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. 15जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. 16ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. 17जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो? 18प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी. 19यावरुन आपण ओळखू की आपण सत्याचे आहोत व त्याच्यासमोर आपल्या अंतःकरणाला धैर्य देऊ, 20कारण जर आपले अंतःकरण आपल्याला दोषी ठरवते, तर आपल्या अंतःकरणापेक्षा देव थोर आहे आणि तो सर्वकाही जाणतो.
शुभवर्तमान
10नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी मुख्य याजकांकडे गेला. 11जेव्हा याजकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्यास पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला. 12बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा बळी करत असत तेव्हा येशूचे शिष्य त्यास म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” 13येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा. 14आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ 15आणि तो तुम्हास माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.” 16शिष्य निघाले आणि ते शहरात गेले आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली. 17संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला. 18मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एकजण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवण करीत आहे.” 19शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?” 20तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच. 21त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याची केवढी दुर्दशा होणार. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.” 22ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.” 23नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुती केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यातून प्याले. 24मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. 25मी तुम्हास खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज पिणार नाही.” 26नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. 27येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’ 28परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.” 29पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. 30मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” 31तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले. 32नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 33येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. 34तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.” 35त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” 36तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.” 37नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? 38जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.” 39पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. 40नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना. 41तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. 42उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 17 फेब्रुवारी म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 2 मार्च. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क