मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 5 फेब्रुवारी
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 5 फेब्रुवारी 2027
शुक्रवार · सामान्यकाळाचा चौथा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या चौथ्या आठवड्याचा शुक्रवार
स्मृतिदिन · उपासनेचा रंग: लाल
संत आगाथा, कुमारिका आणि हुतात्मा · स्मृतिदिन
उपवास आणि प्रायश्चित्त
प्रायश्चित्ताचा दिवस
प्रत्येक शुक्रवार प्रायश्चित्ताचा दिवस आहे; तो कसा पाळायचा ते प्रत्येक बिशप परिषद ठरवते: मांसत्याग किंवा प्रायश्चित्ताचे दुसरे एखादे कृत्य. उपवास 18 ते 59 वयासाठी बंधनकारक आहे, मांसत्याग 14 वर्षांपासून.
दिवसाची वाचने
पहिले वाचन
1बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो. 2लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे. 3तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा. 4सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील. 5आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही” 6म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” 7ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
प्रतिसाद स्तोत्र
1दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू? 3जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन. 5कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला खडकावर उंच करील. 8माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन. 9तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस; तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस! तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस; माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस.
शुभवर्तमान
14हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.” 15इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.” 16परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.” 17हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते. 18व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” 19याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही, 20कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे. 21मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली. 22हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” 23तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” 24ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” 25आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.” 26राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही. 27तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. 28ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. 29हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
आजचे संत
- संत आगाथा, कुमारिका आणि हुतात्मा
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क