Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जानेवारी 2027 › 18 जानेवारी

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 18 जानेवारी 2027

सोमवार · सामान्यकाळाचा दुसरा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या दुसऱ्या आठवड्याचा सोमवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

इब्री 5:1–10

1प्रत्येक यहूदी महायाजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता महायाजक नेमलेला असतो. 2जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो. 3आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत. 4आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. 5त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने महायाजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.” 6दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” 7येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या. 8जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला 10व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 110:1–4

1दाविदाचे स्तोत्र माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.” 2परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील. 3तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत. 4परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”

शुभवर्तमान

मार्क 2:18–22

18जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?” 19येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही. 20परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील. 21कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल. 22तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.”

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क