Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2026 › 22 नोव्हेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 9 नोव्हेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 22 नोव्हेंबर 2026

रविवार · स्वर 8

सण आणि संत

पेन्टेकॉस्टनंतरचा 25वा रविवार

उपवास

उपवास नाही

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

प्रातःप्रार्थनेचे तिसरे शुभवर्तमान

मार्क 16:9–20

9आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मग्दालीया नगराची मरीयाला, जिच्यातून त्याने सात भूते काढली होती, तिला दर्शन दिले. 10ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. 11त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्यास पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. 12यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रकट झाला. 13ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. 14नंतर अकरा शिष्य जेवत बसले असता येशू त्यांना प्रकट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली कारण ज्यांनी त्यास उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. 15तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. 16जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. 17परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. 18ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.” 19मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. 20शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.

प्रेषितांचे पत्र

इफि 4:1–6

1म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे, त्यास योग्य तसे जगावे. 2सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा. 3शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. 4ज्याप्रमाणे तुम्हासही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलावले आहे ‘त्याचप्रमाणे एक शरीर व एकच आत्मा आहे.’ 5एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा, 6एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे.

शुभवर्तमान

लूक 8:41–56

41तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली. 42कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते. 43आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, 44तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. 45मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. 46तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.” 47मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. 48तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.” 49तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. 50पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, “भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल.” 51मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. 52आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.” 53तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. 54पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.” 55तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. 56आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 9 नोव्हेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 22 नोव्हेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क