Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑक्टोबर 2026 › 20 ऑक्टोबर

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 20 ऑक्टोबर 2026

मंगळवार · सामान्यकाळाचा 29वा आठवडा

सण आणि संत

सामान्यकाळाच्या 29व्या आठवड्याचा मंगळवार

आठवड्याचा दिवस · उपासनेचा रंग: हिरवा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

इफि 2:12–22

12त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता. 13पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात. 14कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकांपासून दुभागणारी आडभिंत पाडून टाकली. 15त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी. 16त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. 17ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली. 18कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. 19यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात 20तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे. 22त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 85:8–13

8परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये. 9खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे. 10दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. 11पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे. 12जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल. 13त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.

शुभवर्तमान

लूक 12:35–38

35तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. 36लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. 37मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. 38तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य.

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र A, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष II.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क