Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › नोव्हेंबर 2027 › 29 नोव्हेंबर

ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 16 नोव्हेंबर (जुनी पद्धत)

ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 29 नोव्हेंबर 2027

सोमवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 24वा आठवडा · स्वर 6

सण आणि संत

Holy Apostle and Evangelist Matthew († 60)

नाताळचा उपवास

मासे चालतात

हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.

दिवसाची वाचने

संध्याप्रार्थना: वाचन

1 पेत्र 1:1–2:6

1येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र, 2देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत. 3आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे, 4आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे, 5आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात. 6आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता. 7म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. 8तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. 9कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात. 10तुम्हास प्राप्त होणार्‍या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते. 11त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते. 12त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे. 13म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा. 14तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. 15परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. 16कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.” 17आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. 18कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही. 19निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात. 20खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला, 21आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला. 22तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा. 23कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. 24कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते. 25परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. 2:1म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून, 2परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा. 4मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता, 5तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात. 6म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.”

संध्याप्रार्थना: वाचन

1 पेत्र 2:21–3:9

21कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. 22त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. 23त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले. 24त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. 25कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात. 3:1आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील. 3तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; 4पण अंतःकरणात गुप्त राहणार्‍या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. 5कारण देवावर आशा ठेवणार्‍या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. 6उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात. 7पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये. 8शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. 9तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.

संध्याप्रार्थना: वाचन

1 पेत्र 4:1–11

1म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. 2म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. 3कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात. 4अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. 5तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील. 6कारण, याकरिता, मृतांनादेखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे. 7पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा; 8आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते. 9काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. 10तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा. 11जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.

प्रातःप्रार्थना: शुभवर्तमान

योहा 21:15–25

15मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” 16तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” 17तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.” 18“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” 19तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.” 20तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. 21म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” 22येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” 23तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?” 24जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. 25आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.

प्रेषितांचे पत्र (संत मत्तय यांच्यासाठी)

1 करिं 4:9–16

9कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत. 10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत! 11अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. 12आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो. 13जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. 14मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे. 15कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. 16यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.

प्रेषितांचे पत्र

1 थेस्स 2:20–3:8

20कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. 3:1म्हणून आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनै शहरातच एकटे मागे रहावे, हे आम्हास बरे वाटले. 2आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा; 3तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात. 4कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे. 5ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. 6आता तीमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्याविषयीची शुभवर्तमान आम्हाकडे आणले; 7ह्यामुळे बंधूनो, आम्हास आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले; 8कारण जर तुम्ही प्रभूमध्ये खंबीरपणे टिकता तर आता आम्ही जिवात जीव आल्यासारखे राहतो.

शुभवर्तमान (संत मत्तय यांच्यासाठी)

मत्त 9:9–13

9मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला. 10येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. 11जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?” 12येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे. 13मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”

शुभवर्तमान

लूक 14:12–15

12मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.” 15मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.”

तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 16 नोव्हेंबर म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 29 नोव्हेंबर. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क