Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › फेब्रुवारी 2027 › 22 फेब्रुवारी

कॅथलिक दिनदर्शिका

दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 22 फेब्रुवारी 2027

सोमवार · उपवासकाळाचा दुसरा आठवडा

सण आणि संत

प्रेषित संत पेत्र याचे आसन

सण · उपासनेचा रंग: पांढरा

दिवसाची वाचने

पहिले वाचन

1 पेत्र 5:1–4

1तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो. 2तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने, द्रव्यलोभासाठी नाही पण उत्सुकतेने करा 3आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा. 4आणि मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा मुकुट मिळेल.

प्रतिसाद स्तोत्र

स्तोत्र 23:1–6

1दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. 2तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. 3तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. 4मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. 5तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे. 6खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.

शुभवर्तमान

मत्त 16:13–19

13येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” 14आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.” 15मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” 16शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” 17येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. 18आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. 19मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”

आजचे संत

सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क