Bible Explorer अ‍ॅप मिळवा

बायबल › लेवीय › 3

IRV · अध्याय 3 / 27

लेवीय 3

1जर कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा.

2त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.

3परमेश्वरास शांत्यर्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी,

4दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे

5व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.

6परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.

7जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.

8त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.

9अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.

10दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे.

11मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे.

12“कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.

13त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे.

14त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी.

15दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.

16मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा या सुवासिक शांत्यर्पणाने परमेश्वरास आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.

17तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRV, 2019) · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. (मजकूर बदललेला नाही; तळटीपा आणि शीर्षके वगळली आहेत) · eBible.org